Photo Credit - Karnataka Wather

बेंगळुरू शहरी डीसी जी जगदीशा यांनी मंगळवारी सांगितले की, शहरात मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बुधवारी (२३ ऑक्टोबर) बेंगळुरूमधील शाळांना सुट्टी असेल. दरम्यान कर्नाटकात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगळुरूमध्ये पावसाने सर्वाधिक कहर केला आहे. त्याचवेळी काढणीसाठी तयार असलेली पिके नष्ट होण्याची भीती राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. (हेही वाचा  -  Cyclone Dana Alert: ओडिशा राज्यात मुसळधार पाऊस; भूस्खलनाची शक्यता, 13 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद )

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमध्ये सांगितले की, "आम्ही या संदर्भात पावले उचलली आहेत आणि अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आम्ही मदत देण्यास तयार आहोत." आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही पावसाशी संबंधित आपत्तींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर्व तयारी करण्यात आली आहे आणि साइट सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आम्ही आवश्यक ती सर्व मदत देऊ."

पाहा व्हिडिओ -

बंगळुरूमधील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे दुचाकी वाहनचालकांचे हाल होत आहेत. खड्डे आणि पाणी साचल्याने मोटारी आणि अवजड वाहनांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. वाहनांची सुरळीत वाहतूक आणि जाम टाळण्यासाठी प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. येलहंका येथील सखल भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या भेडसावत आहे.