प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) एका शाखेत फसवणूक केल्याबद्दल बर्‍याच लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सीबीआय (CBI) टीमने मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयला अव्यान ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Avyaan Overseas private limited) आणि त्या कंपनीचे एमडी, स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरूद्ध, बँक ऑफ इंडियाद्वारे तक्रार आली होती. त्यानंतर संचालक, मालक आणि त्या खासगी कंपनीशी संबंधित इतर आरोपी आणि कंपनीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण बँक ऑफ इंडियाच्या शाखेतल्या सुमारे 57.26 कोटी रुपयांच्या फसवणूकीशी संबंधित आहे. या प्रकरणात सीबीआयच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक बँक कर्मचारीही सामील आहेत, म्हणूनच या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता, अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेसोबत झालेली ही फसवणूक 2013 ते 2018 या कालावधीमधील आहे. मेसर्स अव्यान ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्य आरोपी असलेली कंपनी मुंबईत आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फॉरेन बिल नीगोसिएशन लिमिट, एफबी खरेदी-विक्री, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिट अशा अनेक मुद्द्यांवरून फसवणूक केली गेली आहे.

सीबीआयने या प्रकरणातील आरोपी व्यक्ती व कंपन्यांशी निगडित 5 निवासस्थाने व व्यावसायिक स्थानांवर छापेमारी केली. यामध्ये मालमत्ता, कर्ज, विविध बँक खाती आणि लॉकर की यांच्याशी संबंधित काही गुप्त कागदपत्रांची वसुली करण्यात आली आहे. या प्रकरणी, मुंबईस्थित अव्यान ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, आताची बागला ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई व केबीजे हॉटेल्स गोवा प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्यांवर, तसेच यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज, फर्म डायरेक्टर जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बागला आणि इर्तेश मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.