Mohan Yadav, New Madhya Pradesh CM (Photo Credits: X/@ShivAroor)

Ban on Loudspeakers at Religious Places: मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन संपूर्णपणे सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असून त्यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्री म्हणून 13 डिसेंबर (बुधवार) रोजी दिलेल्या आपल्या पहिल्या आदेशात, धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर बंदी घालणे आणि उघड्यावर मांसविक्रीवर बंदी घालणे आणि त्याचे पालन न केल्यास दंड करणे यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. यासह राम मंदिरात येणाऱ्यांचे मध्य प्रदेश सरकार स्वागत करणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा पहिला आदेश लक्षात घेऊन धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी अनियंत्रित लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांचा पहिला आदेश आहे की धार्मिक स्थळांवर लाऊड ​​स्पीकरचा वापर केला जाणार नाही आणि उघड्यावर मांसविक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे. नियमित आणि नियंत्रित (परवानगी डेसिबल) वापरावर कोणतेही बंधन नाही.

दरम्यान, उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव यांनी आज भोपाळमध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्यपाल मंगू भाई यांच्या उपस्थितीत ही शपथ घेतली. राज्यपालांनी जगदीश देवरा (मल्हारगड, मंदसौरचे आमदार) आणि राजेंद्र शुक्ला (रीवाचे आमदार) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. (हेही वाचा: Ayodhya Ram Temple: येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या भाविकांना कसे मिळणार दर्शन आणि प्रसाद)

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहन यादव म्हणाले की, ‘मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्ष हायकमांडचा आभारी आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देणे हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ही जबाबदारी मी सेवकासारखी घेतली आहे. मी विक्रमादित्य शहरातून आलो आहे आणि आम्ही त्याचे राज्य पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करू. जनतेच्या सेवेसाठी मी काम करेन. मी सर्वांना बरोबर घेऊन सुशासनाची खात्री देईन.’