
बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत नुकताच तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर नुकतीच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना 'ममता दीदी यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणून कानावर पडणारे संगीतच' असल्याची प्रतिक्रिया बाबुल सुप्रियो यांनी दिली. कोलकाता येथे झालेल्या या भेटीनंतर सुप्रियो यांनी आनंद व्यक्त केला. पक्षात परतल्याबद्धल ममता दीदींनी ज्या पद्धतीने आपूलकीची भावना व्यक्त केली ती माझ्यासाठी अत्यंत भावूक करणारी होती, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर बाबुल सुप्रियो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, दीदींना भेटून आनंद झाला. मी खूप आनंदी आहे. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने माझ्याशी संवाद साधला. माझे स्वागत केले. त्यांनी मला सांगितले की, तुम्ही मन लावून लोकांची सेवा करा आणि मोकळ्या मनाने गायन करा. त्यांच्या शब्दांनी पुन्हा एकदा त्यांनी माझे मन जिंकले. (हेही वाचा, TIME 100 Most Influential People List 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदार पुनावाला यांचा टाईम मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश)
बाबुल सुप्रियो यांनी म्हटले की, आमच्यात संगीतमय चर्चा झाली. ममता बॅनर्जी यांनी माझ्यासाठी जेही सांगितले ते एखाद्या संगिताप्रमाणे होते. बाबुल यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचे आभार मानले. दरम्यान, बाबुल सुप्रियो यांना नुकतेच मोदी मंत्रिमंडळातून हटविण्यात आले होते. त्यानंतर सुप्रियो यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली होती. मात्र, नंतर काही दिवसांनी त्यांनी थेट तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.