देशावर कोरोना विषाणूचे संकट असताना पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), असम (Assam), पुदुच्चेरी (Puducherry) येथे विधानसभा निवडणुक (Assembly Election 2021) पार पडल्या. या निवडणुकांमुळे मोदी सरकार मोठ्या प्रमाणावर टीकेचे धनी झाले होते. पश्चिम बंगाल मध्ये एकूण 294 जागांवर 8 टप्प्यात मतदान झाले. आसाममध्ये 126 जागांवर तीन टप्प्यात मतदान पार पडले. तामिळनाडू मध्ये 234 जागा, केरळ 140 आणि पद्दुचेरी येथे 30 जागांवर केवळ एका टप्प्यात मतदान झाले. आता आज या निवडणुकांचे निकाल येणार आहेत. 8 वाजता पाचही ठिकाणी मतमोजणी सुरु झाली असून तुम्ही सीएनएन-न्यूज 18 (CNN News18) वर या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
पाचही ठिकाणांमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते पश्चिम बंगालच्या निकालाकडे. कोरोनाच्या संसर्गामध्येही सीएम ममता बॅनर्जी व पीएम नरेंद मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता, त्यामुळे याठिकाणी तृणमूल काँग्रेस भाजपला टक्कर देत आपला गड राखण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तामिळनाडू हे देखील भाजपसाठी महत्वाचे राज्य आहे. सध्या तामिळनाडूमध्ये ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (ADMK) पक्षाचे सरकार आहे. भाजपने यांच्याशी युती करून ही निवडणूक लढवली आहे. दुसरीकडे स्थानिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (DMK) यांची काँग्रेस सोबत आघाडी आहे. एक्झिट पोलनुसार या ठिकाणी डीएमके आणि कॉंग्रेस यांचे सरकार येणार असल्याचे दिसत आहे.
केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फंड (LDF) ची सत्ता आहे. केरळमध्ये एलडीएफचा सामना काँग्रेस - युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आणि भाजप यांच्याशी होता. या ठिकाणी एलडीएफ आणि कॉंग्रेस यांची आलटून पालटून सत्ता राहिली आहे. मात्र एक्झिट पोलनुसार पुन्हा एलडीएफ सत्तेत येणार असल्याचे दिसत आहे.
पुदुच्चेरी येथे एन. नारायणसामी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे सरकार होते, परंतु इथल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक आमदारांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसचे सरकार पडले. आता एक्झिट पोलनुसार भाजपा आणि अन्य पक्षांची युती 30 पैकी 21 जागा जिंकून सरकार बनवू शकते.
असम या ठिकाणी भाजपची सत्ता आहे व पुन्हा एकदा इथे इथेच भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचे दिसत आहे. तर अवघ्या काही काळातच या सर्व विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होण्यास सुरवात होईल.