मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने (Forbes) मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली आहे. या यादीत गौतम अदानी खाली घसरले आहेत. अंबानींचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी जागतिक यादीत 24 व्या स्थानी घसरले आहेत. याआधी 24 जानेवारी रोजी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली.
फोर्ब्सने म्हटले आहे की, अदानी यांची एकूण संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलर्स आहे आणि ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. अंबानी हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली होती. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे. (हेही वाचा: काय सांगता? व्यक्तीने ऑनलाइन गेमिंग अॅपवर गुंतवले 49 रुपये; रातोरात जिंकले 1.5 कोटी)
फोर्ब्सच्या मते, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $2,100 अब्ज आहे. 2022 मध्ये हा आकडा $2,300 अब्ज होता. गेल्या वर्षी जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या यादीनुसार शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. सायरस पूनावाला यांना देशातील चौथ्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळाले आहे. स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आठव्या स्थानावर आहेत.