दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सक्रीय झाले आहेत. ते आज (11 मे) दिल्ली येथील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरास भेट (Arvind Kejriwal Visits Hanuman Temple) देणार आहेत आणि रॅलीही काढणार आहेत. दरम्यान, ते प्रसारमाध्यमांशी संवादही साधणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांंना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ते तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. आम आदमी पक्षाच्या (AAP) दिल्ली येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे प्रसारमाध्यमांसह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांचा रोड शो (Arvind Kejriwal Roadshow) दक्षिण दिल्ली परिसरात सायंकाळी पार पडणार आहे.
केजरीवाल सलग 50 दिवस तुरुंगात
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर पुढच्या काहीच काळात अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण प्रकरणात कथीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका केजरीवाल यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर 21 मार्च रोजी त्यांना ईडीद्वारे अटक झाली. अटक झाल्यापासून पुढचे सलग 50 दिवस केजरीवाल यांनी तुरुंगात घालवले. (हेही वाचा, Arvind Kejriwal Get Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातून 'या' तारखेपर्यंत जामीन मंजूर)
अंतरिम जामीन 1 जूनपर्यंत लागू
सर्वोच्च न्यायालयाने केजलीवाल यांना मंजूर केलेला अंतरिम जामीन येत्या 1 जूनपर्यंत लागू असणार आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर केजरीवाल यांनी ईडी अधिकाऱ्यांसमोर 2 जून रोजी आत्मसमर्पण करणे आवश्यक असणार आहेत. दरम्यान, जामीन काळात ते निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतात. मात्र, जामीन मिळालेल्या काळात त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यासाठी त्यांना मनाई आहे. (हेही वाचा, ED Uncovers Huge Cash In Ranchi: रांची येथे घबाड, तब्बल 30 कोटी रुपयांची रोखड, 6 यंत्रांद्वारे सलग 12 तास उलटले तरी ईडीकडून मोजणी सुरुच (Watch Video))
'हुकूमशाही'चा सामना करण्याचा निर्धार
तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवला यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. या वेळी त्यांनी आपल्याला समर्थन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच, हुकूमशाहीचा सामना एकजुटीने करण्याचा निर्धार त्यांनी केला. याशिवाय यापुढेही आपला लढा कायम राहिल असे ते म्हणाले. दरम्यान, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी आपल्या पतीला मिळालेला जामीन हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले. तसेच, त्यांना तुरुगातून बाहेर पडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न आणि प्रार्थना केली त्या सर्वांचे सुनीता यांनी आभार मानले.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे विरोधकांकडून स्वागत
केजरीवाल यांना जामीन मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेषत: देशभरात पार पडत असलेल्या निवडणुकांच्या काळात विरोधकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून ते याकडे पाहात आहेत.
एक्स पोस्ट
#WATCH | Security arrangements being made by Police outside Hanuman Mandir in Connaught Place, where Delhi CM Arvind Kejriwal will visit to offer prayers today pic.twitter.com/R2K0nUsfHx
— ANI (@ANI) May 11, 2024
जामीन निर्दोषत्व ठरवत नाही- भाजप
केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनावर भाजपने टीका केली आहे. तसेच, त्यांना जामीन मिळाला म्हणजे ते निर्दोष ठरत नाहीत, असेही म्हटले आहे. दरम्यान, केजरीवाल यांचे वकील वकील शादान फरासत यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या निवडणूक प्रचारावर कोणतेही निर्बंध नसून, जामीन आदेश 2 जूनपर्यंत लागू राहील. केजरीवाल 25 मे रोजी होणाऱ्या दिल्लीतील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी AAP च्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे सहभागी होण्याची अपेक्षा आहे.