नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्यावर दिल्लीतील AIIMS रुग्णालयात मागील आठवड्यापासून उपचार सुरु आहेत.खरंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांच्या प्रकृतीबद्दल एक ना अनेक गोष्टी ऐकू येत होत्या. मात्र आता त्यांचे प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याचे समजत आहे. तसेच रुग्णालयात जेटली यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांना त्यांचे शरीर प्रतिक्रिया देत नसल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतेच जेटली यांना व्हेंटिलेटर वरून काढून आता ECMO ((एक्सट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सीजिनेशन) विभागात दाखल करण्यात आले आहे .जेव्हा रुग्णाच्या शरीरातील फुफ्फुसे किंवा हृदय व्हेन्टिलेटरच्या उपचाराला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांना या विभागात आणून शरीराला ऑक्सिजन पोहचवला जातो.
9 ऑगस्टच्या सकाळी प्रकृती अस्वस्थ्यामुळे अरूण जेटलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह भाजपाचे अन्य मुख्य नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन जेटलींची भेट घेतली होती . तर आज, गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हा देखील पुन्हा एकदा AIIMS मध्ये पोहचले आहेत.
दरम्यान, NDA सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात अरूण जेटली यांनी अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. मात्र त्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढत गेल्याने सक्रिय राजकारणापासून अरूण जेटली दूर गेले आहेत.