अॅपल मॅनेजर विवेक तिवारीवर गोळी झाडणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक
विवेक तिवारी (Photo Credits: File Photo)

उत्तर प्रदेशातील एका कॉन्स्टेबलने अॅपलच्या सेल्स मॅनेजरला गोळी मारून त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विवेक तिवारीच्या सहकाऱ्याने सांगितले की, "तपासणी सुरु असताना पोलिस कॉन्स्टेबलला विवेक तिवारीला रोखणे शक्य झाले नाही. म्हणूनच त्याचा पाठलाग करुन त्याला गोळी मारण्यात आली." ही घटना रात्री सुमारे दीडच्या आसपास घडली. त्यावेळेस आयफोन एक्स प्लसच्या लॉन्चिंगनंतर विवेक तिवारी सहकारी सना खानसोबत घरी जात होता.

विवेकच्या सहकाऱ्याने सांगितले की, "गोळी झाडल्यानंतर तिवारी खूप घाबरले आणि त्यांची गाडी जवळच्या एका विजेच्या खांबावर धडकली." लखनऊच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी कलानिधी नैथानी यांनी सांगितले की, "एफआरआय दाखल केल्यानंतर कान्स्टेबल प्रशांत चौधरीवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे."

पोलिसांनुसार, गोमतीनगर एक्सटेन्शनजवळ तपासणी सुरु असताना तिवारी यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याने सांगितले की, तिवारी न थांबता पुढे जात असताना त्यांनी कॉन्स्टेबलच्या एका बाईकला टक्कर मारली. त्यांनी पुन्हा त्याचा पाठलाग केला आणि कॉन्स्टेबलने स्वतःला वाचवण्यासाठी तिवारी यांच्यावर गोळी झाडली.

मात्र याप्रकरणी विवेक तिवारीच्या पत्नी कल्पना तिवारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली आहे.

विजेच्या खांबाला धडकल्यामुळे तिवारी जखमी झाले होते. पण नक्की त्यांचा मृत्यू गोळी लागून झाली की खांबाला धडकल्यामुळे झाला, हे पोस्टमार्टम रिपोर्टवरुन सिद्ध होईल.