Air India Flight Receives Bomb Threat: दिल्ली-इंदूर-मुंबई मार्गावरील (Delhi-Indore-Mumbai Route) एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला (Air India Flight) बुधवारी बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. एअर इंडियाच्या दिल्लीहून इंदूरमार्गे मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला होता, जो नंतर फसवा ठरला. याप्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 636 मध्ये पाईप बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश मंगळवारी संध्याकाळी 5.08 वाजता X सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. एरोड्रोम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने एअरलाइनच्या स्थानिक अधिकाऱ्याच्या तक्रारीचा हवाला देऊन यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा -Bomb Threats to Airlines: पुन्हा 100 विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, धमकी देणाऱ्यांवर घालणार बंदी)
पोलिस उपायुक्त विनोद कुमार मीना यांनी सांगितले की, दिल्लीहून येणारे विमान, इंदूरहून 4.38 वाजता मुंबईसाठी रवाना झाले होते. एअर इंडियाच्या विमानात पाईप बॉम्ब ठेवल्याचा संदेश आमच्या तपासात खोटा असल्याचे सिद्ध झाले. सोशल मीडियावर धमकीचा संदेश पोस्ट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351 (4) (ओळख लपवून गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी विविध भारतीय एअरलाइन्सच्या 100 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. 16 दिवसांत, 510 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमक्या मिळाल्या आहेत ज्या नंतर फसव्या ठरल्या. या धमक्या मुख्यतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या जात होत्या.