महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांवर खोटेनाटे बेछूट आरोप करायचे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन या मंत्र्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवायचे आणि अटक करायची. मंत्र्याला अटक झाली की लगेच त्याच्या राजीनाम्याची मागणी करायची, असे उद्योग सध्या भारतीय जनता पक्षाकडून(BJP) सुरु आहेत. प्रामुख्याने या कारवाया पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अधिक होत आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांनाही अशाच प्रकारे अटक करुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रमाणेच राजीनामा मागितला जात आहे. परंतू, अशा प्रकारे राजीनामा घेतला जाणार नाही. खरे म्हणजे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे हीच मोठी चूक होती, असे वक्तव्य शिवसना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्यासाठी शिवसेना नेते आणि अनेक पदाधिकारी, आमदार, खासदार लोकांना भेटत आहेत. या अभियानांतर्गत संजय राऊत हेसुद्धा आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून टाकल्या जाणाऱ्या धाडींबाबत स्पष्ट भूमिका घेतली तसेच आपले स्पष्ट मतही मांडले. भाजपवरही निशाणा साधला. (हेही वाचा, Dawood Ibrahim Money Laundering Case: मंत्री Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 4 एप्रिल पर्यंत वाढ )
प्रसारमाध्यमांनी संजय राऊत आंना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, राजीनामा घेतला जाणार नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीने मंत्र्यांवर आरोप करता. केवळ त्यांना अडकवायचे हा एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे राजीनामे मागता. आता असे होणार नाही. कोणी आरोप केले म्हणून मंत्र्याचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. नवाब मलिक यांचा राजीनामा तर घेतला जाणार नाहीच. परंतू, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे हे देखील चूक होती, असे संजय राऊत म्हणाले.