आंध्रप्रदेशामध्ये आज सकाळी विशाखापट्टणम मधील आरआर वेंकटपुरम गावामध्ये विषारी वायुगळती झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा बळी गेला आहे. एलजी पॉलिमर (LG Polymers) इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर डोळ्यांमध्ये जळजळ, श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याने त्यांना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहचून स्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. दरम्यान या वायुगळतीमुळे कमाल एक ते दीड किमीच्या भाग प्रभावित आहे. पण या वायूचा वास 2 ते अडीच किमी पर्यंत पोहचला असून 100-200 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ANI ट्वीटच्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका लहान बालकाचा देखील समावेश आहे. सध्या गावातील लोकांच्या मदतीला पोलिस, अग्निशमन दल आणि अॅम्ब्युलंस तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर 5 गावं रिकामी करण्यात आली आहेत. या घटनेनंतर गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी किंग जॉज हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडीतांची भेट घेणार आहे.
ANI Tweet
#UPDATE 3 persons, including one child, dead after chemical gas leakage at LG Polymers industry in RR Venkatapuram village, Visakhapatnam: District Medical & Health Officer (DMHO). #AndhraPradesh https://t.co/sEx1YdgeOZ
— ANI (@ANI) May 7, 2020
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम येथील दुर्घटनेबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि NDMA सोबत चर्चा झाली असून तेथील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. तसेच सार्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थनादेखील केली आहे. तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पीडीतांना मदत करा असे आवाहन ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे.
काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका गॅस विहिरीमधून गॅस लीक झाल्याची घटना समोर आली होती. PFH Oil and Gas Private Limited कडून मेंटेन केल्या जाणार्या एका पाईपलाईनमधून हा गॅस लीक झाला होता.