ओडिशाच्या प्रॉन्स कारखान्यात अमोनिया गॅसची गळती; 90 कर्मचारी रुग्णालयात दाखल, सरकारने दिले चौकशीचे आदेश
Gas Leak (Photo Credits: Twitter/ANI)

ओडिशाच्या (Odisha) बालासोर (Balasore District) येथील एका कारखान्यात, गॅस गळतीमुळे (Toxic Gas Leak) सुमारे 90 कामगार आजारी पडले आहेत. आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतेक महिला कर्मचारी आहेत. या सर्वांना बालासोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका प्रॉन्स (झींगा) कारखान्यात (Prawn Processing Plant) गॅस गळती झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर देशात विविध प्रतिसाद उमटायला सुरुवात झाली, त्यानंतर आता ओडिशा सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना  13 नोव्हेंबर रोजी साधारण रात्री 8 वाजता घडली.

रात्री गॅस गळतीला सुरुवात झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार असे दिसते आहे की, प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळली झाली आहे. बालासोर जिल्ह्यातील खांटापाड़ा येथील पानापाना येथे असलेल्या फाल्कन मरीन एक्स्पोर्ट्सच्या कोळंबी प्रक्रिया कारखान्यात, गॅस गळतीच्या कथित घटनेचा तपास सहा सदस्यांच्या फॉरेन्सिक पथकाने केला. हा अहवाल समोर आल्यावर नक्की काय घडले ते समजेल. (हेही वाचा: मुंबई मधील पूर्व उपनगरीय भागात बहुतांश ठिकाणी गॅस गळतीची तक्रार, अग्निशमन दलाकडून तपास सुरु- रिपोर्ट)

घटनेनंतर जिल्हा दंडाधिकारी सुदर्शन चक्रवर्ती यांनी रुग्णालयात जावून पीडितांची भेट घेतली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. डीजीपी विजय कुमार शर्मा यांनी ट्विट करून या घटनेबाबत खांटपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याबद्दल माहिती दिली. पोलिस अधीक्षक आणि आयजी यांनीही रुग्णालयाला भेट दिली होती. या घटनेच्या पुढील तपासणीसाठी भुवनेश्वर येथून विशेष फॉरेन्सिक टीम पाठविली गेली आहे.