Amit Shah: हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप
Amit Shah | Twitter

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. अमित शाह यांची 1 मे रोजी हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमधील काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठावर काही लहान मुले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी तिकीट परत केलं; निवडणुकीसाठी पक्षाकडून निधी न मिळाल्याने घेतला निर्णय)

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तेलंगणा काँग्रेस पक्षाचे नेते निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, 1 मे रोजी भाजपाची हैदराबादमध्ये रॅली पार पडली. या रॅलीमध्ये अमित शाह यांच्यासह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. व्यासपीठावरील या लहान मुलांच्या हातात भाजपाचे चिन्ह कमळ असणारे एक फलक धरण्यात आले आहे. त्यामुळे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निरंजन रेड्डी यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी अमित शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबर टी यमन सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.