Flight (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून विमानातील बंद असलेल्या सेवा पुन्हा सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमानांमध्ये जेवण आणि इतर सेवांसंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सरकारकडून विमानातील सोयी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया (Air India), खाजगी विमान कंपन्यांनी ऑनबोर्ड मील्स (Onboard Meals) आणि इनफ्लाईट इंटरटेनमेंट (In-flight Entertainment) या सेवा प्रवाशांसाठी सुरु केल्या आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या तेव्हापासून या सेवा बंद होत्या.

या निर्णयानंतर आता विमानांमध्ये प्री-पॅक फूड, स्नॅक्स, जेवण आणि गरम पेय पुरवण्यात येतील. आंतरराष्ट्रीय विमानांतील प्रवाशांना जेवण आणि मर्यादीत स्वरुवात पेय उपलब्ध होतील. यात मद्याचाही समावेश केला आहे. तसंच विमानातील मनोरंजनाच्या सोयींना देखील आता मुभा देण्यात आली आहे. विमानातील टीव्ही स्क्रिन प्रवाशी विमानात येण्यापूर्वी स्वच्छ, निर्जंतुक करण्यात येतील. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर; 77,266 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ)

नव्या गाईडलाईन्सनुसार, चहा, कॉफी, मद्य आणि सॉफ्ट ड्रिंक्स डिसपोजेबल कन्टेनरमधून देण्यात येतील. पूर्वीप्रमाणे एअर हॉस्टेट पदार्थ सर्व्ह करणार नाहीत. कटलरी सेट, स्क्रिन याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होते की नाही हे पाहणे क्रु मेंबर्सची जबाबदारी असेल. तसंच खाद्यपदार्थ, पेय प्रवाशांना देताना क्रु मेंबरने प्रत्येक वेळी नवे हँडग्लोज घालणे गरजेचे असेल.

दरम्यान कोविड-19 चे संकट अद्याप टळलेलेन नाही. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. त्यामुळे प्रवाशांसह क्रु मेंबर्सने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.