टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया (Air India) आपल्या ताफ्याचा आणि नेटवर्कचा विस्तार करत आहे. त्यासाठी कंपनी कॅप्टन आणि प्रशिक्षकांसह 1,000 हून अधिक पायलटची नियुक्ती करणार आहे. एअरलाइन्सकडे सध्या 1,800 पेक्षा जास्त पायलट आहेत आणि त्यांनी बोईंग आणि एअरबससह 470 विमानांची ऑर्डर दिली आहे.
एअर इंडियाकडून एअरबसला दिलेल्या नवीनतम ऑर्डरमध्ये 210 A320/321neo/XLR आणि 40 A350-900/1000 विमानांचा समावेश आहे. बोइंग फर्म ऑर्डरमध्ये 190 737-MAX, 20 बोईंग 787 आणि 10 बोईंग 777 चा समावेश आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये टाटा समूहाने विकत घेतलेली ही कंपनी आता 1,000 हून अधिक वैमानिकांची भरती करत आहे, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कंपनी A320, B777, B787 आणि B737 चा समावेश असलेल्या त्यांच्या ताफ्यातील कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर्स तसेच प्रशिक्षकांसाठी अनेक संधी आणि वेगवान वाढ देत आहे. एअर इंडिया आपल्या ताफ्यात 500 विमानांची भर घालणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अशी बातमी आली होती की, एअरलाइन नवीन पदांसाठी वार्षिक 02 कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज देण्यास तयार आहे. (हेही वाचा: Swiggy Jobs: या वर्षी स्विगी देणार तब्बल 10,000 जणांना नोकऱ्या; केली Apna सोबत भागीदारी)
सध्या भारतीय विमान कंपन्यांमध्ये विमानांच्या संख्येत इंडिगो आघाडीवर आहे, मात्र हा करार पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया पुढे जाईल. यासह एअर इंडियाने या वर्षी जूनपासून मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून शिशिरकांत दास यांची नियुक्ती केली आहे. शिशिरकांत दास हे सध्या विस्तारा येथे अभियांत्रिकीचे प्रमुख आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दास अरुण कश्यप यांच्याकडून पदभार स्वीकारतील, जे एक वर्षाच्या सेवेनंतर नवी संधी शोधण्यासाठी एअर इंडिया सोडत आहेत.