प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास ती लपवून न ठेवता त्यासंदर्भात उपचार घ्यावेत असे ही सांगण्यात आले आहे. कोरोनावर आतापर्यंत बहुतांश जणांनी लढा दिला असून त्यामध्ये चिमुरड्या मुलापासून ते 90 वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसला न घाबरता नागरिकांनी समोर यावे असे सांगण्यात आले आहे. याच दरम्यान, मुंबई येथून परतलेल्या 55 वर्षीय वृद्धाने कोरोनाच्या भीतीपोटी मंगळूरुतील क्वारंटाइन सेंटर मध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे वैज्ञानिकांकडून कोरोनावर लसीसाठी संशोधन केले जात आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर नर्स, डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला घाबरुन जाऊ नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा काही जणांनी कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत.(मुंबईच्या बार डान्सर्सचा Quarantine Centre मध्ये दारूसाठी धिंगाणा; पोलिसांनी दाखल केला गुन्हा Watch Video)

दरम्यान, मागील 24 तासांत देशात 5,609 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले असून 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,12,359 इतका झाला असून अद्याप 63624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 3435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात अधिक नागरिक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 39297 झाला असून यात 1,390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.