46 workers rescued from Mana avalanche site (PC - ANI)

Uttarakhand Avalanche Update: माना हिमस्खलन (Avalanche) घटनास्थळावरून 46 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सुटका केलेल्यांपैकी काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी उत्तराखंडमधील चमोली (Chamoli in Uttarakhand) जिल्ह्यातील माना गावाजवळील (Mana Village) सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) कॅम्पमध्ये मोठे हिमस्खलन झाले, ज्यामध्ये 56 कामगार बर्फाखाली गाडले गेले. खराब हवामान असूनही रात्रभर लष्कराच्या अथक प्रयत्नांनंतर हे बचाव कार्य पार पाडण्यात आले. सुटका केलेल्या लोकांना ताबडतोब माना आर्मी कॅम्पमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करून चमोलीच्या माना भागात सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये पुष्टी केली की, आतापर्यंत 46 कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मोदींनी दिले आहे. (हेही वाचा-Glacier Burst in Badrinath Dham: बद्रीनाथ धाम येथे हिमकडा कोसळला, 55 कामगार बर्फाखाली अडकले)

गंभीर जखमी कामगारांना उपचारासाठी विमानाने हलविण्याचे निर्देश -

मुख्यमंत्री धामी यांनी सांगितलं की, हवामानात सुधारणा झाल्यामुळे बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना गंभीर जखमी झालेल्या कामगारांना विमानाने हलविण्याचे निर्देश दिले आहेत. तथापी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, 'ते प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चमोली येथे जात आहेत. भगवान बद्री विशाल यांच्या आशीर्वादाने आणि बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे, आम्ही अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अधिकारी पूर्ण वेगाने काम करत आहेत आणि हिमस्खलनात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर वाचवण्याची खात्री करत आहेत.' (हेही वाचा, Uttarakhand Glacier Burst: चमोली दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी सरसावला भारताचा स्टार फलंदाज, केली मोठी घोषणा)

चमोलीमध्ये रात्रंदिवस बचाव कार्य सुरू -

दरम्यान, एसडीआरएफचे सचिव विनोद कुमार सुमन यांच्या मते, सुरुवातीच्या अहवालात असे सूचित केले गेले होते की, त्या ठिकाणी 57 कामगार होते. परंतु नंतर असे समजले की, त्यापैकी दोघे रजेवर होते आणि त्यामुळे अडकलेल्या कामगारांची संख्या 55 ​​होती. खराब हवामान असूनही, भारतीय लष्कर, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्या जवानांकडून रात्रंदिवस बचाव कार्य सुरू आहे. या मोहिमेत 150 हून अधिक सैनिक भाग घेत आहेत.

सात फूट बर्फवृष्टीमुळे बचावर कार्यात अडथळा -

घटनास्थळी सात फूट बर्फवृष्टी झाल्यामुळे बचाव पथकांसाठी काम अत्यंत कठीण झाले आहे. प्रभावित कामगार उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमधील आहेत. शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर बचाव कार्यात सामील होण्यासाठी पाठवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.