Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

Mysuru Shocker: कर्नाटकातील म्हैसूर (Mysuru) येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी एका कुटुंबातील चार सदस्य मृतावस्थेत आढळले, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एक किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूरमधील विश्वेश्वरैया नगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. चेतन (वय,45), त्याची पत्नी रूपाली (43), त्यांचा मुलगा कुशल (15) आणि चेतनची आई प्रियंवदा (62) अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित सदस्यांना विषबाधा झाली होती, तर चेतनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शहर पोलिस आयुक्त सीमा लाटकर आणि डीसीपी जान्हवी घटनास्थळी पोहोचल्या असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेतनचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची पत्नी आणि मुलगा अपार्टमेंटमधील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्याची आई प्रियंवदा त्याच कॉम्प्लेक्समधील एका वेगळ्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, आर्थिक अडचणींमुळे या मृत्यू घडल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, चेतनवर मोठ्या कर्जामुळे मोठा आर्थिक दबाव होता. (हेही वाचा - Suicide At Atal Setu: अलिबागमधील शिक्षकाने अटल सेतू पुलावरून उडी मारून केली आत्महत्या; ठरला होता सेक्सटॉर्शनला बळी)

रविवारी संध्याकाळी उशिरा ही धक्कादायक घटना घडली. तथापी, चेतनच्या एका नातेवाईकाने पोलिसांना कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकाला चेतनकडून एक व्हॉइस मेसेज मिळाला ज्यामध्ये त्याने आपले जीवन संपवल्याचा उल्लेख केला होता. चेतन हा मूळचा हसनमधील गोरूर या गावचा रहिवासी होता. 2019 मध्ये म्हैसूरला परतण्यापूर्वी तो दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करत होता. (हेही वाचा: Boy Drowns In Water Tank In Thane: नातेवाईकाच्या घरी गेला आणि जीव गमवून बसला! इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू)

प्राथमिक तपासाचा हवाला देत, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चेतनने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विष पाजले आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी. तथापि, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.