
Panipat Gang Rape Case: हरियाणातील पानिपत (Panipat) मध्ये थांबलेल्या ट्रेनमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी प्रथम महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिला रुळावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान एक ट्रेन रुळावर आली. या ट्रेनच्या धडकेत पीडितेचा पाय कापला गेला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ट्रेनच्या रिकाम्या डब्यात महिलेवर सामूहिक बलात्कार -
प्राप्त माहितीनुसार, पानिपतमध्ये थांबलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही महिला 38 वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे. 26 जून रोजी पोलिसांना महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली. पोलिसांनी सांगितले की, 24 जून रोजी झालेल्या वादानंतर तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याचे सांगितले होते.
बलात्कारानंतर पीडितेला रुळावर दिलं फेकून -
पीडितीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ती जवळच्या रेल्वे स्थानकावर बसली होती, तेव्हा एक पुरूष तिच्याकडे आला आणि म्हणाला की तिला तिच्या पतीने पाठवले आहे. त्याने महिलेला थांबलेल्या ट्रेनच्या डब्यात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आणखी दोन जण तिथे पोहोचले आणि त्यांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर ते महिलेला सोनीपत येथे घेऊन गेले. तिथून त्यांनी तिला रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान एक ट्रेन आली आणि या ट्रेनने महिलेला धडक दिली. यात महिलेने आपला पाय गमावला.
सध्या या पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किला पोलिस स्टेशनचे एसएचओ श्री निवास यांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराचा झिरो एफआयआर नोंदवण्यात आला असून तो पानीपत सरकारी रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) पाठवण्यात आला आहे. जीआरपीचे एसएचओ राजेश यांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी झिरो एफआयआर प्राप्त झाला. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.