26/11 दहशतवादी हल्ला: पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
26/11 Terror Attack (Photo Credit: Getty Images)

26 नोव्हेंबर 2008 (26/11 Terror Attack) मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा (Abdul Rehman Pasha) आणि मेजर इक्बाल (Major Iqbal) या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या दोघांपैकी मेजर अब्दुल रहमान पाशाने निवृत्ती घेतली असून मेजर इकबाल आयएसआय मध्ये कार्यरत आहे.

दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमॅन हेडली साक्षीचा माफीदार बनला असून त्याच्या जबाबावरुन दोघांचेही अटक वॉरंट जारी केले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी शाखेने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात मेजर पाशा आणि मेजर इकबाल दोषी आढळले आहेत. (दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा- डोनाल्ड ट्रम्प)

याप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, "चौकशी दरम्यान हेडलीने फक्त दहशतवाद्यांची नाही तर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचीही नावे घेतली होती."

त्यामुळे मुंबई गुन्हेगारी शाखा आणि निकम यांच्या निवेदनानुसार, अपर सत्र न्यायाधीशांनी या दोन पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केले. 6 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होईल. 26/11 Mumbai Terror Attack: दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे ५ मोहरे

26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्री मार्गांनी 10 दहशतवादी मुंबईत घुसले. त्यांनी ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल समवेत सीएसटी रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स आणि अन्य ठिकाणी बेशूट गोळीबार आणि बॉम्बहल्ले केले. या दहशतावादी हल्ल्यात 18 सुरक्षारक्षकांसमवेत 166 निष्पाप लोकांचा बळी गेला.