सुरक्षेच्या कारणास्तव WHO ने थांबवली हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची चाचणी; 25 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
May 25, 2020 10:56 PM IST
कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जनता आता सरावली आहे. लॉकडाऊन काळात नियमांचे पालन करुन आपले व्यवहार करण्यात नागरिक बऱ्यापैकी प्राधान्य देत आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला नसला तरी, काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल (24 मे 2020) राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादात लॉकडाऊन आणि तो हटविण्याबाबत काही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन निर्णयाची घोषणा करणे आणि तो अचानक जाहीर करणे चुकीचे होते. त्याच प्रमाणे 31 मे नंतर लॉकडाऊन जसा जाहीर केला त्याच पद्धतीने म्हणजेच अचानकपणे हटविणे चुकीचे ठरेल. कोरना व्हायरस संकट हळूहळू कमी होत जाईल. परंतू, पुढचे सर्वात मोठे आव्हान असेल ते राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती देण्याचे. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्राकडून मिळणारा निधी, उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या रेल्वे यांबाबत काही मुद्दे मांडले. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही मजुरांची यादी केंद्राला द्या. आम्ही हव्या तेवढ्या ट्रेन देऊ, असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र विरुद्ध केंद्र असा संघर्ष पाहायाला मिळतो काय? याबाबत मोठी चर्चा आहे. दरम्यान, यांसह शेती, अर्थ, उद्योग आणि विविध घटना घडामोडी आणि ठळक मुद्द्यांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलले राहा.