ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी (Photo Credit-Twitter)

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय कामगिरी करणारे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आज निधन झाले. ते 78 वर्षांचे असून कॅन्सरने ग्रस्त होते. यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

याच युद्धावर आधारीत बॉर्डर सिनेमाची निर्मिती झाली होती. सिनेमात मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलने साकारली होती. चांदपुरी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लढत पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. पाकिस्तानच्या 2000 सैनिकांचा 90 भारतीय सैनिकांनी पराभव केला.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मेजर यांच्या मृत्यूनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, मेजर कुलदीप सिंग यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. ते अतिशय प्रतिष्ठित सैनिक होते. त्याचबरोबर लढाईचे नायक होते. त्यांच्या मृत्यूने देशाचे नक्कीच नुकसान झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून सांत्वन करतो.

22 नोव्हेंबर 1940 ला गुर्जर शीख कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप सिंग यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते लष्करात दाखल झाले.