आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी लोकसंख्येबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी लोकांना 16 मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. चेन्नईतील हिंदू धार्मिक आणि धर्मादाय मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीएम स्टॅलिन यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात 31 जोडप्यांनी लग्न केले होते. यावेळी ते म्हणाले की, जोडप्यांनी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे. एमके स्टालिन यांनी आपल्या भाषणाच्या वेळी सांगितले की, आधी वडिलधारे लोक नवविवाहित जोडप्यांना 16 प्रकारच्या संपत्तीसाठी आशीर्वाद देत असत. कदाचित आता 16 प्रकारच्या मालमत्तेऐवजी 16 मुले असण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा वडिलधारी लोक म्हणायचे की, तुम्हाला 16 मुले असावीत आणि समृद्ध जीवन जगावे, तेव्हा त्याचा अर्थ 16 मुले नसून 16 प्रकारच्या मालमत्ता होत्या, ज्याचा उल्लेख लेखक विश्वनाथन यांनी गाय, घर, पत्नी, मुले, शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, शिस्त, जमीन, पाणी, वय, वाहन, सोने, मालमत्ता, पीक आणि प्रशंसा, अशा प्रकारे केला आहे. मात्र आता तुम्हाला कोणी 16 प्रकारच्या संपत्ती मिळण्यासाठी आशीर्वाद देत नाही. त्यापेक्षा फक्त पुरेशी मुले होण्याचा आणि समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद दिला जातो.’
लोकसंख्या वाढवण्याबाबत असे वक्तव्य करणारे स्टॅलिन हे एकमेव मुख्यमंत्री नाहीत. स्टॅलिन यांच्या आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही लोकांना दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. शनिवारी (19 ऑक्टोबर) अमरावती येथे एका मेळाव्याला संबोधित करताना नायडू यांनी 2047 नंतरही राज्याचा लोकसंख्याशास्त्रीय फायदा राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी लोकांना दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. याशिवाय आता दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांनाही महापालिका निवडणुकीत उमेदवारी देता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Ageing Population in South India: 'जनतेने अधिक मुलांना जन्म द्यावा'; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री Chandrababu Naidu यांचे आवाहन, वृद्ध लोकांच्या वाढत्या लोकसंख्येचा दिला दाखला)
एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील तरुणांच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, दक्षिण भारतीय राज्यांतील लोकांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रिया आल्या आहेत.