प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मोदी सरकार सत्तेत आल्यावर ‘बेरोजगारी नष्ट करणे’ या मुद्यावर विशेष भर देण्यात आला होता. मात्र 1993-94 नंतर यावेळी पहिल्यांदाच देशात बेरोजगारीचा इतक्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 4 कोटी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाअंतर्गत येणाऱ्या NSSO (National Sample Survey Office) ने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर चांगलाच शाब्दिक हल्ला चढवला आहे.

1993-94 मध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या 21.9 कोटी एवढी होती. 2011-12 मध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची ही संख्या 30 कोटी 40 लाख एवढी झाली. 2017-18 मध्ये पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाखांवर येऊन पोहचली आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण 4 कोटी 70 लाख रोजगार कमी झाले आहेत. शहरी भागातील बेरोजगारीचा दर 7.1 टक्के तर ग्रामीण भागात हा दर 5.8 टक्के इतका आहे. (हेही वाचा: नोटाबंदीने हिसाकावल्या जनतेच्या नोकऱ्या, गेल्या 45 वर्षात पहिल्यांदा भारतात बेरोजगारीचे वातावरण)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी दिले होते. मात्र 2018 मध्ये देशात दिवसाला 27 हजार रोजगार बुडाले आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील लोकांना अधिक बसला आहे, कारण या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील 96 टक्के पुरुष तर 68 टक्के स्त्रियांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. याबाबतीत राहुल गांधी यांनी केलेले ट्वीट चांगलेच गाजत आहे. ‘मला वाटत होते की भारतात दररोज 450 नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, मात्र याउलट दिवसाला 27,000 हजार जॉब नष्ट होत आहेत. भारताचे पंतप्रधान हा एक विनोद बनून राहिला आहे’ अशा आशयाचे हे ट्वीट आहे.