Isha - Anand Wedding : दीपिका रणवीर, प्रियंका निक यांच्या लग्नानंतर आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचे लग्न होऊ घातलंय. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानीचा विवाह आनंद पिरामलशी 12 डिसेंबरला करण्याचे योजले आहे. लग्न ही जितकी त्या दोघांसाठी एक वैयक्तिक गोष्ट असते तितकीच कुटुंबासाठी तो एक सामाजिक सोहळा असतो. त्यात अंबानी कन्या म्हणजे काही विचारूच नका. या लग्नाचा थाट काही औरच असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या संगीत सेरेमनीवरून याची कल्पना आलीच असेल. या सेरेमनीमध्ये बियोन्सेने भारतातील पहिला परफॉर्मन्स दिला. ऐश्वर्या, सलमान, रणबीर पासून झाडून सर्व सेलिब्रिटी या सेरेमनीमध्ये थिरकताना दिसले. आता संगीत असे पार पडले तर लग्नाची ती काय बात. या लग्नावर होत असलेला खर्च पाहून मुकेशजींनी हे जगातील सर्वात श्रीमंत लग्नांपैकी एक लग्न व्हावे यासाठीच चंगच बांधला आहे, कारण या लग्नाचा संपूर्ण खर्च हा तब्बल 700 करोड रुपये असेल असे सांगण्यात येत आहे.
लग्नाच्या भव्यतेची सुरुवात आली ती लग्नपत्रिकेवरून. अंबानीकन्येच्या या लग्नाची एक पत्रिका तब्बल 3 लाखाची आहे.
ईशाचे संगीत उदयपूर येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी विमानतळ ते हॉटेल या दरम्यान पाहुण्यांची ने-आन करण्यासाठी तब्बल 100 पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. बॉलीवूडची अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमात सामील झाली होती. हिलरी क्लिंटन याही प्रमुख पाहुण्यांपैकी एक होत्या.
उदयपूर येथे झालेल्या कार्यक्रमांदरम्यान अंबानी कुटुंबाने तब्बल चार दिवस 5100 लोकांना तीन वेळचे जेवण दिले होते. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचा एक छोटा बाजारदेखील वसवला होता.
लग्नाचा सोहळा मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ऍन्टिलिया (Antilia) इथे पार पडणार आहे. त्यानंतर हे जोडपे त्यांच्या नवीन डायमंड थीम, 452 करोड रुपयांच्या घरात राहायला जाणार आहे.
ईशाचे लग्न हे जगातील सर्वात श्रीमंत लग्नापैकी एक ठरणार आहे. या लग्नाची तुलना प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांच्या लग्नाशी केली जात आहे. कारण त्यावेळी या राजघराण्यातील लग्नाला जितका खर्च आला होता जवळजवळ तितकाच खर्च इशाच्या लग्नाला येणार आहे.
या लग्नाची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण होत आली असून, घरही सजले आहे. 27 मजली ऍन्टिलिया दिव्यांच्या रोषणाईने झगमगून गेला आहे.