मुकेश अंबानी (Photo Credit: PTI)

एकीकडे समाजामध्ये असलेली आर्थिक तफावत कशी कमी करता येईल याबाबत विचार चालू असताना, दुसरीकडे 1000 हजार करोड संपत्ती असलेल्या लोकांच्या यादीत 34 टक्क्यांनी भर पडलेली दिसून येते.

नुकतेच बार्कलेस हूरुन इंडियाकडून भारतातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार आता देशात एकूण 831 लोक आहेत ज्यांची संपत्ती 1 हजार करोड रुपयांच्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी सलग सातव्या वर्षी देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी प्रतिदिन 300 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 3 लाख 71 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत गेल्या सात वर्षांपासून प्रथम स्थानी विराजमान आहेत.

विशेष म्हणजे, एकट्या मुकेश अंबानी यांची संपत्ती या यादीत असलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या अनुक्रमे एस. पी. हिंदुजा आणि कुटुंब, एल. एन. मित्तल अँड कुटुंब आणि अजीम प्रेमजी यांच्या एकत्रित संपत्तीहून अधिक आहे.

यादीत समावेश असलेल्या श्रीमंत व्यक्तींची संपत्ती 719 अब्ज डॉलर इतकी असून ती देशाच्या 2850 अब्ज डॉलर इतक्या जीडीपीच्या एक चतुर्थांश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

या आहेत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

1. रिलायंसचे मुकेश अंबानी  - 371,000 कोटी

2. एस पी हिंदूजा आणि परिवार  - 159,000 कोटी

3. लक्ष्मीनिवास मित्तल अँड फॅमिली  - 114,500 कोटी

4. विप्रोचे अजीम प्रेमजी - 96,100 कोटी

5. दिलीप सांघवी -  89,700 कोटी

6. उदय कोटक - 78,600 कोटी

7. सायरस एस पूनावाला  - 73,000 कोटी

8. गौतम अडाणी एंड फेमिली  - 71,200 कोटी

9. सायरस पलोनजी मिस्त्री  - 69,400 कोटी

10. शापूर पलोनजी मिस्त्री  - 69,400 कोटी

ओयेचे मालक 24 वर्षीय रितेश अग्रवाल हे या यादीतले सर्वात तरुण व्यक्ती असून 'एमडीएच मसाले'चे मालक 95 वर्षीय धर्मपाल गुलाटी हे सर्वात वृद्ध अतिश्रीमंत व्यक्ती आहेत.