खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर संरक्षण मंत्रालयात महत्त्वाची जबाबदारी; जितेंद्र आव्हाड म्हणतात पंतप्रधान मोदींनी त्यांना शिक्षा दिली
Sadhvi Pragya Singh Thakur (Photo Credits- IANS)

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांना संरक्षण मंत्रालयाच्या (Defense Ministry) कमिटीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. साध्वी यांची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयातील या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. या कमिटीत एकूण 21 सदस्य आहेत. या कमिटीमध्ये फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक जिंकल्यानंतर ठाकूर या त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानावरून चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य, आदी वक्तव्यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका झाली.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिलेल्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट हँडलवरून टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या 'माझ्या शापामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला' या स्टेटमेंटवर मोदी इतके नाराज झाले की काल त्यांनी रागाच्या भरात त्यांना शिक्षा म्हणून संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर घेतलं, असं ट्विट केल आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट - 

2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर साध्वी यांच नाव चर्चेत आलं. 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी एका मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात वापरण्यात आलेल्या मोटारसायकलची नोंदणी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती.