Representational Image (Photo Credit- Flickr)

आज मॉन्सून (Monsoon) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मंगळवार पर्यंत अंदमान बेटांच्या आणखी काही भागात पाऊस पडणार आहे.

यंदा मॉन्सून 22 मेपर्यंत अंदमान-निकोबार बेट तसेच त्याजवळील भागात दाखल होण्याची शक्यता आहे. आज मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेटाच्या दक्षिण भागात हजेरी लावली. यावर्षी मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. मागील वर्षी 18 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. (हेही वाचा - आता देशातील प्रत्येक जिल्हातून धावणार 'Shramik Special' ट्रेन; जिल्हाधिकारी तयार करणार अडकलेल्या कामगारांची यादी- रेल्वेमंत्री पियुष गोयल)

दरम्यान, बंगालच्या उपसागरात ‘अमफन’ चक्रीवादळ तयार झाले आहे. हे वादळ ताशी सहा किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 12 तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मॉन्सूनवर परिणाम होणार आहे.

दक्षिण व उत्तर भारतातील हवेचा दाब कमी झाला आहे. केरळात 1 जूनला दाखल होणारा मान्सून 28 मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तळकोकणात 5 जूनला दाखल होणारा मान्सून 1 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रातही मान्सून त्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.