PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली खूशखबर! किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची रक्कम 'या' तारखेला जमा होणार
Indian Farmers | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

PM Kisan Samman Nidhi: जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत 12 व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. केंद्र सरकार या महिन्यात दिवाळीपूर्वी 12 व्या हप्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करू शकते. खरं तर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन आयोजित करत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पीएम किसानचा 12 वा हप्ताही पीएम मोदी जारी करू शकतात.

PM किसान सन्मान निधी ही मोदी सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या लक्षात घेऊन सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत, सरकार 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना 6000 रुपयांची मदत देते. आतापर्यंत 11 वा हप्ता जारी झाला आहे. तर शेतकरी बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अॅग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन 2022 हे 'बदलती कृषी परिस्थिती आणि तंत्रज्ञान' या थीमवर आधारित आहे. या कार्यक्रमात सुमारे 1500 स्टार्टअप आणि 13,500 शेतकरी सहभागी होणार आहेत. (हेही वाचा - Rupee vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; एका डॉलरची किंमत 82.22 रुपयांवर पोहोचली)

दरम्यान, आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते जमा केले आहेत. 11 व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी वर्ग करण्यात आले होते. या योजनेद्वारे, सरकार चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते जारी करते. अशाप्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

तथापी, पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना केंद्र सरकारने आधीच सांगितले होते की, त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचे 12 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. सरकारने पीएम किसान अंतर्गत ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. आता ही तारीख निघून गेली आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी ई-केवायसी करून घेतले आहे, त्यांनाचं पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत.