Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा विस्तार सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राला पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हे विशेष पत्र राज्याला उद्देशून लिहिण्यात आले आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) येथे कोरोना व्हायरसची परिस्थिती गंभीर होत असल्याने 8 आंतर-मंत्रालयीन टीम (Inter-Ministerial Central Teams) राज्याला भेट देणार आहे. मुंबई, पुणे या कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांची तपासणी करणार असून परिस्थिती सुधारण्यासंदर्भात राज्य सरकारला विशेष सूचना देण्यात येतील. राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या असून कोरोना संकटात कार्यरत असलेल्या डॉक्टर्सवर हल्ले देखील करण्यात आले आहेत. तसंच अनेकदा सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई, पुणे ही महत्त्वाची शहरे कोरोना बाधितांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. सध्या मुंबई शहरात कोरोनाचे 2724 रुग्ण असून पुण्यात 611 रुग्ण आहेत. तर येथे कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची संख्याही अधिक आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून येथील रुग्णसंख्येत सातत्याने मोठी भर पडत आहे. तरी देखील लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्र लिहून राज्य सरकारला सूचित केले आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 4483 पोहचली असून मागील 12 तासांत कोरोनाचे 283 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईत 187 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आजपासून राज्यात काही व्यवसाय, उद्योगांना सूट देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन संपला असे कोणी समजू नये. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केवळ अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना देण्यासाठी काही उद्योग, व्यवसायांना परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.