Mewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन
Mewalal Chaudhry (PC - Twitter)

Mewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बिहार सरकारचे माजी मंत्री मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhry) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी जेडीयूतील तारापूरचे आमदार मेवालाल चौधरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी पहाटे साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते.

मेवालाल चौधरी हे सलग दुसऱ्यांदा तारापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मेवालालाल चौधरी हे भागलपूर येथील सबौर कृषी विद्यापीठाचे कुलपती देखील होते. कुलगुरू असताना त्यांच्यावर नियुक्ती घोटाळ्याचा आरोप होता. 2 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी आणि तारापूरच्या माजी आमदार नीता चौधरी यांचा मृत्यू झाला होता. (वाचा - Madhya Pradesh: कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेवर वार्ड बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न; आरोपीला अटक)

देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी जात आहे. तसेच नवीन कोरोना संक्रमणाची संख्यादेखील रेकॉर्ड ब्रेक करत आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांत एकूण 2,74,994 नवीन संक्रमण आढळले, तर 1620 लोकांचा मृत्यू झालाय दुसरीकडे, बिहारमध्ये विक्रमी 8,690 संक्रमित लोक आढळले आहेत. यातील बहुतेक रुग्ण 2,290 पाटण्यात सापडले आहेत. रविवारीदेखील कोरोनाचा कहर कायम होता. बिहारमध्ये रविवारी 76 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 23 जण पाटणा आणि 58 जण इतर जिल्ह्यातील होते.