Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि गुन्हेगारी (Crime) यांचे नाते फार पूर्वीपासून आहे. गेल्या काही वर्षांत यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. बलात्कार, खून, मारामाऱ्या या गोष्टी फारच कॉमन झाल्या आहेत. अशीच भर वस्तीत घडलेल्या गोळीबाराची घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साधारण 7.30 वा. दिल्लीमधील रोहिणी सेक्टर 11 मध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या गोळीबारात हा तरुण जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव मनीष असे असून तो खेडा खुर्द (Kheda Khurd) येथील रहिवासी आहे. आपल्या गाडीने तो जात असताना, काही गुंडांनी पाठलाग करून त्याची गाडी थांबवली. त्यानंतर गोळीबार सुरु केला. हे पाहून मनीष तिथून जीव मुठीत घेऊन पळू लागला. गुंडांनी परत त्याचा पाठलाग करीत हा गोळीबार चालूच ठेवला. अशाप्रकारे मनीषवर तब्बल 17 गोळ्या झाडल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (हेही वाचा: पुणे: पत्ता माहित असूनही न सांगितल्याच्या रागात तरुणावर गोळीबार

यातील 4 गोळ्या मनीषला लागल्या असून, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मनिषला पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत के.एन.काटजू मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.