पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) आता अधिक रंगतदार होऊ लागली आहे. या वेळी निवडणुकीत प्रामुख्याने सामना तृणमूल काँग्रेस (TMC) विरुद्ध भाजप ?(BJP) असा होताना दिसतो आहे. प्रचार, सभा, रॅली आदी गोष्टींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज (29 मार्च) त्यांची नंदीग्राम येथे रॅली आहे. अत्यंत कडक उन्हात व्हीलचेअरवरुन रोड शो करणाऱ्या ममता बॅनर्जी लक्ष वेधून घेत आहेत.
ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपने शुभेंदु अधिकारी यांना मैदानात उतरवले आहे. शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी या वेळी पराभूत होणार असा दावा केला आहे. तर ममता बॅनर्जी यांनी सर्व ताकद पणाला लावून प्रचार सुरु ठेवला आहे. मध्यंतरी त्यांच्यावर झालेला हल्ला आणि पायाला झालेली दुखापत पहाता त्या थांबतील असे अनेकांना वाटत होते. परंतू, ममता बॅनर्जी यांनी प्लास्टर गुंडाळलेल्या पायांनी निवडणूक प्रचार सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार ममतांचा आजचा रोड शो 8 किलोमीटर इतका प्रस्तावीत आहे. खुरीदारम येथून सुरु होणारा हा रोड शो ठाकुर चौक पर्यंत जाणार आहे. रोडशोदरम्यान ममता बॅनर्जी यांनी आपला मार्ग बदलला आहे. ममतांनी आपला निश्चित मार्ग बदलत रोड शो गावांच्या दिशेने वळवला आहे. दुपारी 1.30 वाडचा ममचा बॅनर्जी ठाकुर चौक येथे एक सभा घेतील. या सभेनंतर 2 वाजता त्या जाहीर सभा घेणार आहेत. नंदीग्राम येथील अहमदाबाद हाय स्कूल मैदानावर दुपारी 3.30 वाजता त्या सभा घेणार आहेत. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: 'डिस्को डान्सर कोबरा' पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक रिंगणाबाहेरच, मिथुन चक्रवर्ती यांना भाजप तिकीट नाहीच)
ममता बॅनर्जी या कडक उन्हात सभा घेत आहेत. रोड शो करत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या व्हील चेअरवर आहेत. गेल्या वेळी त्या जेव्हा नंदीग्राम येथून निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाल्या होत्या तेव्हा त्यांच्या पायाला जखम झाली होती. काही लोकांनी हल्ला केल्यानेच ही जखम झाल्याचा त्यांनी आरोप केला होता.