West Bengal: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा घेणार पश्चिम बंगाच्या  मुख्यमंत्रिपदाची शपथ; जाणून घ्या शपथविधीचा वेळ
Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

West Bengal: ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक केली. टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. कोविड-19 च्या साथीमुळे शपथविधी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने घेण्यात येईल. शपथविधी सोहळ्यासाठी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान आणि माकपचे ज्येष्ठ नेते बिमान बोस यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील कोविड-19 साथीची सद्यस्थिती लक्षात घेता अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना या समारंभासाठी आमंत्रित केले गेले नाही. एका अधिकाऱ्यांने सांगितलं की, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा शपथविधी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी केवळ एकट्या ममता बॅनर्जी शपथ घेतील. हा एक अतिशय संक्षिप्त कार्यक्रम असेल. शपथविधी सोहळ्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. (वाचा - West Bengal Violence: हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी चर्चा)

तृणमूल कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते फिरहाद हकीम हेदेखील 5 मे रोजी सकाळी 10:45 वाजता राजभवनात शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. सूत्रांनी सांगितले की शपथ घेतल्यानंतर लवकरचं ममता बॅनर्जी राज्य सचिवालयात जातील. तेथे त्यांना कोलकाता पोलिस सलाम देतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसी 292 पैकी 213 जागा जिंकून सलग तिसर्‍या वेळी सत्तेत आली आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये 77 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी इतरांनी दोन जागा जिंकल्या आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बंगालमधील हिंसाचारामुळे कोलकाता येथे दाखल झाले आहेत. भाजप आज बंगालमधील हिंसाचाराविरोधात देशभरात धरणे आंदोलन करणार आहे. कोलकातामध्ये जेपी नड्डा आणि दिलीप घोष स्वत: आंदोलन करणार आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या शानदार कामगिरीनंतर ममता बॅनर्जी यांची प्रभावी सेनापती म्हणून उदयास आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपला त्यांनी पराभूत केलं आहे. या ममता बॅनर्जी यांच्या तिसऱ्यांदा झालेल्या विजयामुळे केवळ बॅनर्जींचे राज्यातील स्थान बळकट होणार नाही, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्यात मदत होणार आहे.