Larsen & Toubro Limited (PC - ANI)

PM Cares Fund: 'लार्सन अँड टुब्रो लिमिटेड' (Larsen & Toubro Limited) कंपनीकडून कोरोना विरोधातील लढाईसाठी पीएम केअर फंडला (PM Cares Fund) 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात देशातील नागरिकांना पंतप्रधान केअर फंडला आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर देशभरातील सर्वसामान्य नागरिक, कलाकार, उद्योजक आणि विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला. अभिनेता अक्षय कुमारने या फंडासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी या फंडाकरिता 100 कोटी रुपये दिले आहेत. तसेच देशातील खासदारांनी कोरोनाग्रस्तांसाठी खासदार निधी तसेच एक महिन्याचं वेतन देऊ केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus च्या लढाईत मुकेश अंबानी यांचा मदतीचा हात; रिलायन्सकडून PM CARES Fund साठी 500 कोटींची मदत)

पंतप्रधानांच्या ट्विटनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे धावून आले. आतापर्यंत अक्षय कुमार, सनी देओल, वरुण धवन, कार्तिक आर्यन, सलमान खान, राजकुमार राव, कपिल शर्मा, अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी आर्थिक मदत केली आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने पीएम केअर फंड मध्ये 500 कोटींची घोषणा केली आहे. याशिवाय रिलायन्स महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्री मदत निधीला 5-5 कोटी रुपये देणार असल्याच म्हटलं आहे. तसेच कंपनीकडून येत्या 10 दिवसांसाठी 5 लाख लोकांना अन्नदान केले जाणार आहे.