Krishna Janmastami 2022 Celebration: देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कृष्ण जन्माष्टमी उत्सव; मथुरेत जमली भाविकांची गर्दी, पहा फोटोज
Krishna Janmastami (PC - ANI)

Krishna Janmastami 2022 Celebration: : कृष्ण जन्माष्टमीची आज देशभरातील मंदिरांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपासून जन्माष्टमीचा उत्सव सुरू झाल्याने मथुरेतील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. या पवित्र सणानिमित्त शहरातील मंदिरे रंगीबेरंगी रोषणाईने सजली आहेत. संपूर्ण शहरात आणि मंदिरांमध्ये "जय श्री कृष्ण"चा जयघोष होत आहे. देशभरातील कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईतील इस्कॉन मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली आहे. नोएडा येथील इस्कॉन मंदिरात पहाटेची आरती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

त्याचवेळी केरळच्या कोझिकोडमध्ये, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लहान मुलांसह भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. एका संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, "जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, मी भारत आणि विदेशातील सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात आणि शिकवणीत कल्याण आणि सद्गुणाचा संदेश समाविष्ट होता. त्यांनी "निष्काम कर्म" या संकल्पनेचा प्रचार केला आणि लोकांना 'धर्म' मार्गाने परम सत्याची प्राप्ती सांगितली. मी प्रार्थना करतो की, ही जन्माष्टमी आपल्याला आपल्या विचार, शब्द आणि कृतीतून सद्गुणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल." (हेही वाचा - Krishna Janmashtami 2022 Celebration: कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा देशभर उत्साह; PM Narendra Modi यांनीही दिल्या शुभेच्छा)

भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देशभरात जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भाविक उपवास करतात आणि मंदिरात प्रार्थना करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान कृष्णाचा जन्म भाद्र महिन्याच्या आठव्या दिवशी झाला होता. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार, हा दिवस मुख्यतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंदीगडमध्ये संपूर्ण शहर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आले होते. या उत्सवानिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.

कर्नाटकातही कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बेंगळुरू येथील इस्कॉन मंदिरात लोक जमले आहेत.

महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईतील इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू होताच लोकांनी गर्दी केली.