देशात सेक्स (Sex) आणि त्याबाबतची विकृती याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. महिलांवर बलात्कार (Rape), त्यांची फसवणूक, ब्लॅकमेल (Blackmail) अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) शहरातील दोन नामांकित व्यावसायिकांच्या मुलांना अटक केली आहे. त्यांच्यावर सुमारे 182 महिलांशी कनेक्शन बनवून, त्यांची अश्लील छायाचित्रे काढून, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या मुलांच्या घरातील स्वयंपाक्यालाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आतापर्यंत 182 महिलांचे व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.
कैलाश यादव (कुक), अनिश लोहारुका आणि आदित्य अग्रवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जेव्हा या लोकांनी एका युवतीला फोनवर ब्लॅकमेल करून, दहा लाख रुपयांची मागणी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आदित्य अग्रवाल याचे वडील कोलकाता शहरातील सुप्रसिद्ध कपड्यांचे उद्योजक आहेत. त्यांचा देशभरात कपड्यांचा किरकोळ व्यवसाय आहे.
तर अनीश लोहारुकाच्या कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय आहे. मात्र लोहारुका कुटूंबाने या गोष्टी आणि हा आरोप फेटाळून लावले आहेत. यामध्ये अनिशला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अग्रवाल कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्नही करण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोहारुकाच्या लॅपटॉपची फाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविली गेली होती आणि त्यात 182 फोल्डर्स आढळले असून, त्यात अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. हे तीनही आरोपी 2013 पासून एकत्र हे काम करत आहेत. कैलाश आणि अनीश आधी मुलींशी मैत्री करायचे, मग त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करायचे. एकदा का मुलगी पूर्णतः जाळ्यात अडकली मग ते तिच्यासोबत सेक्स करून व्हिडिओज बनवायचे.