कमल हासन (Photo Credits: PTI)

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशात सर्वजण आपला निषेध दर्शवत आहेत. राजकारणी लोकांपासून सामान्य जनतेपर्यंत लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. याबाबत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच सुपरस्टार आणि राजनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त वक्यव्य केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना कमल हासन यांनी पाकव्याप्त काश्मीरला 'स्वतंत्र काश्मीर' असे संबोधले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे.

रविवारी चेन्नई येथे एका कार्यक्रमात बोलताना, कमल हासन यांनी काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी अशी कल्पना मांडली. यामुळे काश्मीर येथील जनतेला भारतात राहायचे आहे, पाकिस्तान मध्ये जायचे आहे का स्वतंत्र काश्मीर म्हणून राहायचे आहे हे समजेल. तसेच भारत सरकार अशी चाचणी घेण्यास का घाबरत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, ‘भारताचे वागणे मुर्खतेचे आहे. दोन्ही देशातील राजकारणी एकत्र येऊन या मुद्यावर योग्य असे आचरण करतील तर अशा हल्ल्यासारख्या गोष्टी होणारच नाहीत, एकाही सैनिकाला आपले प्राण गमवावे लागणार नाहीत, नियंत्रण रेषा नियंत्रणात राहील.’

‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता, यामध्ये 40 पेक्षा जास्त भारतीय जवान शहीद झाले होते. याबाबत चेन्नई येथे कमल हासन यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपले मत व्यक्त करताना, ‘काश्मीरमध्ये जवान मरण्यासाठी जातात असे कोणी बोलले की मला वेदना होतात. भारतीय सेनाही जुन्या फॅशनसारखी झालीय. ज्याप्रकारे जग बदलत आहे, आपण कसे ठरवू शकतो की माणूस खाण्यासाठी दुसऱ्या माणसाला मारू शकत नाही. युद्ध, वाद संपवण्याचीही एक वेळ येईल. मानवतेने गेल्या 10 वर्षात काही शिकवले नाही का?’ असे विचार मांडले.