BJP National President: भाजप नेते जेपी नड्डा (JP Nadda) हे या वर्षाच्या अखेरीपर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहण्याची शक्यता आहे. कारण, भाजप (BJP) डिसेंबरपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये अधिकृतपणे संपला आहे. तथापि, त्यांना महत्त्वाची सरकारी कर्तव्ये देण्यात आली आहेत. परिणामी, भाजप लवकरच नवीन अध्यक्षाच्या शोधात आहे. नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते गुजरातमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे आरोग्य, रसायने आणि खते या खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
1 ऑगस्टपासून सुरू होणार नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया -
या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपूर्वी, 15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सभासदत्व मोहीम राबवली जाणार असून जिल्हा आणि राज्य घटकांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यानंतर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सक्रीय सदस्यत्वाची मोहीम राबविण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सक्रिय सदस्यत्वाची पडताळणी करण्यात येणार आहे. (हेही वाचा - JP Nadda On BJP Win: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा इंडिया युतीवर टीका, जातीवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप, (Watch Video))
भाजप पक्षाच्या घटनेनुसार, प्रत्येक सदस्याला दर नऊ वर्षांनी त्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. या वर्षी, सदस्यत्व मोहिमेत पंतप्रधान, पक्षाध्यक्ष आणि सदस्यत्वाचे नूतनीकरण करणारे सर्व पक्ष नेते यांचा समावेश असेल. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भाजप मंडल (स्थानिक युनिट) अध्यक्षांसाठी निवडणूक घेणार आहे. यानंतर 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाध्यक्षांची निवडणूक होणार आहे. (हेही वाचा - JP Nadda Gets Extension For BJP Chief: जेपी नड्डा यांना भाजप पक्षाध्यक्ष पदासाठी जून 2024 पर्यंत मुदतवाढ, अमित शाह यांची माहिती)
1 डिसेंबरपासून प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीला सुरुवात -
भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर पुढील चरणांमध्ये राज्य परिषद आणि केंद्रीय परिषदेसाठी सदस्य निवडणे या बाबींचा समावेश आहे. या निवडणुकीनंतरच प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.