दिल्ली पोलिसांचे यश; जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक, 2015 पासून होता फरार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) हाताला फार मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला आज श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. फैय्याज अहमद लोन (Faiyaz Ahmad Lone) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. पोलिसांकडून या फैय्याजवर दोन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते, तसेच त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. 2015 पासून हा दहशतवादी फरार होता, शेवटी आज त्याला अटक करण्यात यश आले आहे. 2015 साली दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून आपल्या दोन साथीदारांसह लोन फरार होता.

दिल्लीतील डीडीयू मार्ग येथे 2007 साली स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यानंतर पाकिस्तानी नागरिक व 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना सोडून देण्यात आले होते मात्र 2015 साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून फैय्याज फरार होता. सध्या फक्त फैय्याजला पकडण्यात यश आले असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध चालू आहे.