Jaganmohan Reddy (Photo Credits: IANS)

एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) पार पडल्या होत्या. त्यानंतर राज्यातील राजकारण संपूर्णपणे पालटले. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा धुव्वा उडवत, जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या वायएसआरने (YSRCP) फार मोठा विजय मिळवला. आता राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मोठा निर्णय घेतला आहे. आता आंध्र प्रदेश राज्यात, एक नाही.. दोन नाही तर तब्बल 5 उपमुख्यमंत्री (Deputy Chief Ministers) असणार आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्यात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत. यावेळी, लोकांच्या अपेक्षा लक्षात घेता नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले गेले. शनिवारी 25 जण मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती जगमोहन रेड्डी यांनी दिली. याआधी चंद्राबाबू नायडू यांनी कापू आणि ओबीसी समाजातील एका व्यक्तिला उपमुख्यमंत्रीपद दिले होते.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अडीच वर्षांच्या काळात कामगिरी पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आपल्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत, त्यामुळे वायएसआर काँग्रेस आणि यापूर्वीच्या सरकारमधील फरक जनतेला दाखवून द्यायचा असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसला अनुक्रमे 25 पैकी 22, आणि 175 पैकी 151 जागा मिळाल्या आहेत.