Isha Ambani-Anand Piramal Wedding Reception : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुलीचे लग्न थाटामाटात पार पडले. 12 डिसेंबर रोजी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि आनंद पिरामल (Anand Piramal) यांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. 'अँटिलीया’ या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या विवाहसोहळ्यास बॉलिवूड, राजकारणी, क्रीडा आणि उद्योग विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या लग्नाची दखल घेतली होती. तब्बल 700 करोड रुपये खर्च करून लावण्यात आलेले हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. आज (शुक्रवार) या लग्नाचे भव्य रिसेप्शन पार पडणार आहे. मुंबईमधील बांद्रा येथील जिओ गार्डन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे हे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
संध्याकाळी 7.30 वा. या रिसेप्शनला सुरुवात होईल. या रिसेप्शनसाठी ‘फॉरमल’ ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनी पाहुण्यांसाठी एका संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. (हेही वाचा : Isha Ambani-Anand Piramal Wedding : हिलेरी क्लिंटन, प्रणव मुखर्जीसह अनेक बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी)
आज होणारे हे रिसेप्शन अगदी हाय प्रोफाईल असल्याने साहजिकच यात अनेक व्हीआयपी लोक सामील होणार आहेत. म्हणून मुंबई पोलिसांनी काही रहदारीचे निर्बंध घातले आहेत. भारत नगर/आयएलएफएस जंक्शन ते बँक ऑफ बडोदापर्यंतच्या मार्गावर दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत एकेरी वाहतूक सुरु राहील.
बीकेसी इमारतीकडून भारत नगर जंक्शनच्या दिशेने येणाऱ्या लोकांनी, बीओबी-कॅनरा बँक जंक्शनपासून डावीकडे वळून पुढे आर 2 (R2) ग्राउंडकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कॅपिटल बिल्डिंग जंक्शनकडे जाणाऱ्या एसईबीआय जंक्शन (SEBI junction) मार्गावरही आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत एकेरी वाहतूक चालेल. कॅपिटल जंक्शनपासून डावे वळण घेण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. तसेच शक्य असल्यास शुक्रवारी संध्याकाळी बीकेसी परिसरात जाणे टाळावे.
ईशाचा मुख्य विवाहसोहळा पार पडण्याआधी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे उदयपूरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडले होते. यावेळी संगीत, मेहंदी असे अनेक कार्यक्रम पार पडले. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी, उद्योजकांसह अनेक मान्यवर हजर राहिले होते. त्यानंतर 12 डिसेंबरला लग्न झाले, आता आज रिसेप्शन पार पडणार आहे.