शेअर मार्केट (फोटो सौजन्य- फेसबुक)

कोरोना व्हायरस (Corona Virus) चा वाढता प्रादुर्भाव, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सुरु असणारे दर युद्ध, मंदी या साऱ्यामुळे आज शेअर बाजारात कित्येक वर्षातील सर्वात मोठी पडझड पाहायला मिळाली. आज शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स (Sensex) तब्बल 3100 अंकांनी तर निफ्टी (Nifty)  950 अंकांनी कोसळला होता, त्यामुळे काही वेळापूर्वी निफ्टी मध्ये लोअर सर्किट (Lower Circuit) लागू करण्यात आले होते, परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीचा कारभार 45 मिनिटांपुरता बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही मार्केट सुरु झाले असून परिस्थिती स्थिर होत असताना दिसत आहे. या सर्व घडामोडींमध्ये आपण लोअर सर्किट लागू करण्यात आले हे वाक्य बराच वेळ ऐकत असाल पण याचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला ठाऊक आहे का? ठराविक दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली किंवा बाजारीने उसळी घेतल्यास लोअर किंवा अप्पर सर्किट (Upper Circuit) लावले जाते. या दोन्ही परिस्थीती शेअर बाजारातील संतुलनास घातक असतात, यांचे अर्थ अगदी सोप्प्या शब्दात जाणून घ्या..

(हे ही वाचा-मुंबई शेअर बाजार मध्ये पडझड कायम)

लोअर सर्किट

शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्यास लोअर सर्कीट लावले जाते. कमी कालावधीमध्ये सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लावले जाते. लोअर सर्किट म्हणजे एका ठराविक किंमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आणखीन पडझड होत नाही. यामध्ये सुरुवातीला 45 मिनिट हे सर्किट लागू होते, मात्र तरीही परिस्थिती न सुधारल्यास 1 तास 45 मिनिट इतका कालावधी व्यवसाय बंद असतो. यापूर्वी 2017 मध्ये निफ्टी 8,800 अंकांवर पोहचला असताना लोअर सर्किट लागू करण्यात आले होते, त्यांनतर आता तीन वर्षांनी पुन्हा ही परिस्थिती उद्भवली होती.

अपर सर्किट

लोअर सर्किटच्या उलट शेअर बाजाराने अचानक उसळी घेतल्यास अपर सर्किट लावले जाते. अशावेळेस प्रत्येक शेअरचा दर एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढवता येत नाही. शेअर बाजारामध्ये संतुलन कायम रहावा म्हणून हे सर्किट लावले जातात.

दरम्यान, शेअर बाजारातील आजची पडझड ही मागील काही काळातील सर्वात मोठी घसरण म्हणता येईल, शेअर मार्केट सुरु होताच अवघ्या दहा मिनिटात सेन्सेक्स आणि निफ्टीची उतरलेली आकडेवारी समोर आली होती. दुसरीकडे सोने बाजारात सुद्धा भाव उतरताना दिसून आले आहेत, आज सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी उतरले आहेत.