लायन एअरवेज विमान अपघात : दिल्लीचा भाव्ये सुनेजा होता इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक
लायन एअरवेज विमान अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक भाव्ये सुनेजा

लायन एअरलाईन्सच्या भीषण अपघाताच्या बातमीने आज आठवड्याची सुरूवात झाली आहे. 188 जणांसह जकार्ताहून निघालेलं विमान टेक ऑफनंतर अवघ्या 13 मिनिटांत अपघातग्रस्त झाले. या विमानाचे अवशेष समुद्रात सापडले असून प्रवाशांसह पायलट आणि क्रू मेंबर्सदेखील अपघातात ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जकार्ताहून पान्गकल पिनांगला निघालेल्या विमानाचा पायलट भारतीय असल्याचे वृत्त समोर आहे. भाव्ये सुनेजा हा लायन एअरलाईन्सचा ग्रुप कॅप्टन होता. 31 वर्षीय भाव्ये दिल्लीमध्ये मयूर विहार भागात राहत असे. मार्च २०११ पासून लायन एअरवेजमध्ये भाव्ये काम करत होता. बोईंग ७३७च्या उड्डाणाचा अनुभव चांगला होता त्यामुळे एअरवेजने त्याला जकार्तामध्ये ठेवले होते. लवकरच जुलै 2019 पासून तो पुन्हा भारतामध्ये रूजू होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याबाबत बोलणी सुरू असल्याचं भारतीय हवाई कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र जकार्ताहून सकाळी 6.20 मिनिटांनी निघालेलं विमान 6.33 नंतर संपर्कात नव्हते. इंडोनेशियाकडून तात्काळ शोध मोहिम सुरू करण्यात आली. अखेर समुद्रात या विमानाचे अवशेष सापडले.

Boeing 737 MAX 8 हे नवीन विमान भाव्ये चालवत होता. 2 महिन्यांपासून हे विमान वापरामध्ये होते.