COVID19 Patients Recoveries: दिलासादायक! भारतात गेल्या 24 तासात 57,989 रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांवर
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

COVID19 Patients Recoveries: भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. रोगमुक्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे भारतात कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर जवळपास 75 % वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 57,989 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे ही रुग्ण बरे होण्याची संख्या आज 22,80,566 वर पोहोचली आहे.

भारतातील रुग्ण बरे होण्याची संख्या आता सक्रीय रुग्णांपेक्षा (7,07,668) 16 लाखांनी (1,572,898) वाढली आहे. रुग्ण बरे होण्याची दैनंदिन सरासरी संख्या सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 30 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज 69,239 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 912 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने ओलांडला 30 लाखांचा टप्पा; 69,239 नव्या रुग्णांच्या मोठ्या भरीसह 912 जणांचा मृत्यू)

दरम्यान, रुग्ण बरे होण्याच्या संख्येत निरंतर वाढ होत असल्यामुळे हे निश्चित झाले आहे की, देशातील वास्तविक सक्रीय रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. तसेच एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ 23.24 % रुग्णांचा सध्या समावेश आहे. यामुळे देखील हळूहळू मृत्यूदर कमी होत आहे. सध्याचा भारतातील रुग्णांचा 1.86% हा मृत्यू दर (सीएफआर) जगातील सर्वांत कमी दर असणाऱ्यांपैकी एक आहे. चाचणीची आक्रमकपणे यशस्वी अंमलबजावणी करणे, उपाययोजनांचा व्यापकतेने संपूर्णपणे आढावा घेणे आणि चाचणी करणे, यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.