Indian Railways (Photo Credits: PTI)

Lockdown In India: भारतीय रेल्वे लॉकडाऊन दरम्यान दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वे गाड्या (Special Parcel Trains) चालवणार आहे. यासंदर्भात भारतीय रेल्वेने (Indian Railways) निर्णय घेतला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता आहे. लॉकडाऊन काळात देशातील जनतेला अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेही गरजेचे आहे. परंतु, सरकारने माल वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना चढ्या भावात जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी लागत आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल, खासदार सुरेश अंगडी 'पंतप्रधान केअर फंड'ला एक महिन्याचा पगार देणार)

सर्वसामान्य नागरिकांना तसेच देशातील कोरोना बाधित रुग्णांना दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे काही विशेष पार्सल गाड्या चालवणार आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही. कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत भारतीय रेल्वेने मोठं योगदान दिलं आहे. भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहेत.

याशिवाय आज रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी आपला एक महिन्याचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रेल्वेतील 13 लाख कर्मचाऱ्यांनी 151 कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडला मदत म्हणून दिले आहेत. त्यामुळे देशाच्या कठीण प्रसंगी भारतीय रेल्वे सरकारला होईल त्या मार्गाने मदत करत आहे.