देशासाठी आनंदाची बातमी; 'Ease of doing business' यादीमध्ये भारत पोहोचला 77च्या स्थानावर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे चाललेल्या या सरकारसाठी फार मोठी आनंदाची बातमी घडली आहे, जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत (Ease of doing business) भारताला 77वे स्थान मिळाले आहे, आधी भारत 100व्या स्थानावर होता, यात तब्बल 23 स्थानांची सुधारणा होऊन भारताला हे स्थान प्राप्त झाले आहे.

वर्ल्ड बँकेकडून 190 देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात भारताला समाधानकारक स्थान मिळाले आहे. या स्थानामुळे सरकारच्या आर्थिक सुधारणेला फार मोठे समर्थन मिळाले आहे. मात्र आता मोदी सरकारचे आपल्या देशाला top-50 मध्ये आणण्याचे लक्ष्य असेल. मागच्या दोन वर्षात भारताच्या क्रमवारीत 53 स्थानांची सुधारणा झाली असून, नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून 65 स्थानांची सुधारणा झाली आहे.

वर्ल्ड बँकेचा हा रिपोर्ट आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत आपण 142 वरून 77व्या स्थानावर पोहचलो आहोत. वेळोवेळी केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यासाठी जी पावले उचलली गेली त्याचेच हे फळ मिळाले आहे. ज्या वेगाने भारत प्रगतीपथावर चालला आहे, या वेगाने इतर कोणत्याही देशाने प्रगती केली नाही. ‘

सत्ता आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत पहिल्या 50 देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता भारत ज्या प्रकारे विकसित होत आहे हे पाहून पंतप्रधानांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही.