Indian Coast Guard rescued 264 fishermen (PC- Twitter)

अरबी समुद्रात 3 डिसेंबरपासून अडकलेल्या 264 मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली आहे. हवामान बिघाड झाल्यामुळे मच्छिमारांच्या 50 बोटी समुद्राच अडकल्या होत्या. तटरक्षक दलाने व्यापारी जहाजांच्या मदतीने या मच्छिमारांना समुद्राबाहेर काढले आहे. भारतीय तटरक्षक दलाला तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून मच्छिमारांच्या बोटी अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच तटरक्षक दलाने मदतकार्याला सुरुवात केली आणि मच्छिमारांची सुटका केली. (हेही वाचा - भारतीय तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानची 'अल मदीना' बोट, 500 कोटीचे ड्रग्ज जप्त)

या मच्छिमारांच्या बोटी पश्चिम गोव्यापासून 250 नॉटिकल मैल अंतरावर अडकल्या होत्या. तटरक्षक दलाने 7 व्यापारी जहाजांच्या मदतीने मच्छिमारांची सुटका केली. व्यापारी जहाजांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मच्छिमारांची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन 'मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर'ने या मोहिमेत सहभाग घेतला होता. दोन ते तीन दिवसांपासून अडकलेल्या मच्छिमारांना सुटका झाल्यानंतर खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे. या मच्छिमारांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, समर, सावित्रीबाई फुले, अमल आणि अपूर्वा या जहाजांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. तसेच एका हेलिकॉप्टरची मदत घेऊन तटरक्षक दलाने ही मोहिम फत्ते केली. तटरक्षक दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.