Wheat (PC - ANI)

Wheat Import: केंद्राने परदेशातून गहू आयात (Wheat Import) केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. भारतात गहू आयात करण्याची कोणतीही योजना नाही, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. वास्तविक, पूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. यानंतर भारत परदेशातून गहू आयात करणार असल्याची बातमी आली. मात्र, सरकारने यास दुजोरा नाकारला आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे की, भारतात गहू आयात करण्याची कोणतीही योजना नाही. आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा साठा आहे. याशिवाय भारतीय अन्न महामंडळाकडे सार्वजनिक वितरणासाठी पुरेसा साठा असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Delhi Excise Policy Scam: मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, देश सोडण्यावर बंदी; CBI ने जारी केली लुकआउट नोटीस)

दरम्यान, भारताने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे आलेले जागतिक अन्न संकट. अलीकडेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, जगभरात अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत जर आपण निर्यात सुरू केली तर होर्डिंग वाढण्याची शक्यता आहे. अन्नधान्याची गरज असलेल्या देशांना याचा फायदा होणार नाही. आमच्या या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेवरही परिणाम होणार नाही. कारण जागतिक बाजारपेठेत भारताची निर्यात एक टक्क्यापेक्षा कमी आहे.